ठाकरे शब्दाला पक्के आहेत हे सिद्ध झाले आहे ! – सामना
मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आरे मधील झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली होती. या तोडलेल्या झाडांच्या कारवाईनंतर पर्यावरण प्रेमींचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यातच रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड प्रकल्प उभा राहील, असे जाहीर केले होते. मात्र यावेळी त्यांनी अहंकारातून हा निर्णय घेतल्याचे फडणवीसांनी बोलून दाखविले होते. हाच मुद्धा पकडत आजच्या सामनातून फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
खून, बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन राजकीय स्वार्थासाठी केले जाते, पण ‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केला जातो. ‘आरे’च्या जंगलामधील दोन हजारांवर झाडांची एका रात्रीत सामुदायिक कत्तल केली गेली. झाडांनाही जीव आहे हे मान्य केले तर ते आरेच्या जंगलातील सामुदायिक हत्याकांडच मानावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तेथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेऊन त्या मृत झाडांना विनम्र श्रद्धांजलीच अर्पण केली. पर्यावरणावर नुसती भाषणे देऊन काय होणार? धाडसाने निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्रातील वृक्ष, वेली, नद्या, झाडे, पक्षी, प्राणी, डोंगर, कडेकपारी आज आनंदाने बहरून निघाली असतील. हा आनंद चिरकाल टिको! असे राऊत यांनी म्हटले आहे.
आजचा सामनातील अग्रलेख…
मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले, ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील. पर्यावरणप्रेमींना सुखावणारा हा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाचे प्रचंड कौतुक सध्या होत आहे. मुंबईसारख्या शहराला प्राणवायू पुरवणारे आरेचे जंगल हे सव्वा कोटी लोकसंख्येचे फुफ्फुस आहे. या फुफ्फुसावर हल्ला केला असता तर मुंबईचा श्वास गुदमरला असता.
जंगले, झाडे, नद्या, समुद्र, आदिवासी वाचवायला हवेत असे नुसते बोलून भागत नाही. निसर्ग मारून विकासाची वीट रचता येणार नाही. विदर्भातील विकासातला सगळय़ात मोठा अडसर म्हणजे तेथील झुडपी जंगले. त्या झुडपी जंगलांबाबत निर्णय न घेणारे आरेतील जंगलतोडीसाठी एका रात्रीत निर्णय घेतात. दोन हजारांवर झाडे कापली जातात. त्या झाडांवरील पक्ष्यांची घरटी, त्यांची पिले तडफडून मारली जातात व या अमानुषतेविरुद्ध आवाज उठवणाऱयांना अटक केली जाते. हे प्रकार जंगलराजला लाजवणारेच होते.
आता आरेतील ‘कारशेड’ कांजूरमार्गला हलवली यावर भाजपसारख्या विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे. श्री. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘‘हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला हा निर्णय आहे’’. श्री. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. कापलेल्या झाडांवर डोके टेकून अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय? फडणवीस सरकारने अहंकार बाजूला ठेवून र्यावरणप्रेमींचा मान राखला असता आणि जंगलातील कारशेड कांजूरला आधीच नेली असती तर काय बिघडले असते? पण त्या वेळीसुद्धा अहंकार आडवा आला.
विरोधकांचे म्हणणे असे की, कारशेड आरेतून कांजूरला नेल्यास चार हजार कोटींचा जादा भुर्दंड सोसावा लागेल. प्रत्येकाचे आकडे वेगळे आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेली माहिती अगदी वेगळी आहे. कांजूरला कारशेड उभारताना सरकारला खर्च येणार नाही. कांजूरची जागा सरकारचीच आहे. त्यामुळे त्या जमिनीसाठी एक छदामही मोजावा लागणार नाही. पुन्हा ‘आरे’त जी इमारत वगैरे उभी केली आहे असे सांगतात ती इमारत इतर सरकारी कार्यासाठी वापरली जाईल. सरकारने यापूर्वी आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती.