देशातील दोनच राज्यात राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला शिवसेना नेते खासदार राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारला चिमटा काढला आहे.
महाराष्ट्रात मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला आहे.
राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून, राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटले. त्यानंतर, पुन्हा एकदा राऊत यांनी मोदी सरकारला राज्यपालांच्या भूमिकेवरुन जोरदार टोला लगावला होता.
देशात केवळ दोनच राज्यात राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये, असे राऊत यांनी म्हटले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात. कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहे, म्हणून देशातील या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.