परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाने तातडीने करावेत. पंचनामे करताना शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुनच पंचनामे करा. त्याचबरोबर बाधित क्षेत्रात उभ्या पिकांचे, कापून शेतात पडलेल्या पिकांचे व अतिपाण्याने कुजले पिक या त्रिसुत्रीनुसार पंचनामे करावेत, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिले.
मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली तालुक्यातील खारेपाटण, कासार्डे, कुडाळ तालुक्यातील आंब्रड- पावशी, पिंगुळी-गुडीपूर व माणगाव तिटा येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शेतात जाऊन पाहणी केली. जिल्ह्यामध्ये सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लावण आहे. त्यापैकी अंदाजे ६ हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसामुळे बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या कोरोनाची साथ सुरु आहे. यामधून सावरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असतानाच परतीच्या अतिपावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही शासन या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळेल याकडे लक्ष द्यावे. पंचनामे करणाऱ्या यंत्रणांनी गावातील एखाद्या ठिकाणी बसून पंचनामे न करता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समक्ष त्यांची मते जाणून घेवून पंचनामे करावेत असे अडीच प्रसकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहे.