उपमुख्यमंत्री अजित पवार घरी क्वारंटाइन; सर्व बैठका रद्द

उपमुख्यमंत्री-अजित-पवार-Deputy Chief Minister-Ajit-Pawar

मुंबईमधील घरात क्वारंटाइन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं. नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती. अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”.

 

गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला होता. सोलापुरात बोलताना त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं. “एकही शेतकरी सुटणार नाही,” असं ते म्हणाले होते. अजित पवारांनी यावेळी तात्काळ पंचनामे पूर्ण कऱण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here