‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ हा भाजपचा नारा – संजय राऊत
भाजपाकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिलेली आहे. मात्र या जाहीरनाम्यात बिहारच्या जनतेसाठी मोफत वॅक्सीन अर्थात कोरोना लस वाटण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. आता त्यांच्या या घोषणेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
कोरोनाची लस केवळ भाजपा शासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का?, असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’, अशी घोषणा वाचली होती. त्याप्रमाणाचे आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपला मत न देणाऱ्यांना कोरोनाची लस देणार नाही, अशाप्रकारचे राजकारण क्रुर आहे. मध्य प्रदेशातही भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि जे.पी. नड्डा यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले.