पंकजा मुंडे यांच्याकडून शरद पवारांचे कौतुक, येणाऱ्या राजकीय भूकंपाची चाहूल?
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र मंगळवारी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित केलेल्या बैठीकीत या दोघांची एकत्र उपस्थिती लावल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नसाठी या सर्व नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
पुण्यात झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे या शरद पवारांच्या कामाने प्रभावित झाल्या आहेत. त्यांनी एक ट्विट करून शरद पवारांचे खुल्या मनाने कौतुक केले आहे. शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे त्यांनी कौतुक केले आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या त्यांच्या ट्विट मध्ये, ‘@PawarSpeaks hats off… कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे’. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या ट्विटनंतर नवीन राजकीय समिकरणे पाहायला मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.