अन्यथा रोषाला सामोरे जावे लागले ; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी दिला इशारा.
बिग बॉस या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दोन कलाकारांमध्ये झालेल्या संभाषणावरून नवा वाद उसळला आहे. एक पुरुष कलाकाराने एका मराठी महिला कलाकाराला माझ्याशी मराठीत बोलू नको आणि मराठीत बोलायचं असेल तर बोलू नकोस, असा चढ्या आवाजात इशारा दिला. हा कार्यक्रम प्रसारित होताच ही बाब अनेक जणांना निदर्शनात आली. त्यावर महाराष्ट्रातील असंख्य कलाकार आणि नेते मंडळींनी आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्रात मराठी अस्मितेवर बोट उचलणाऱ्या अनेकांना प्रखर रोषाला सामोरे जावे लागले आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आहे. परंतु या प्रकरणावर आता युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करून इशारा दिला आहे.
‘महाराष्ट्रात राहून मराठी द्वेष?? बिग बॉस कार्यक्रम चालतो महाराष्ट्रात आणि असली विधानं करायची ह्यांची हिम्मत होते कशी ?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. बिग बॉसच्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्तीने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे.