५ नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी बस शहरवासियांसाठी खुली – मंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी बस नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत असल्याची घोषणा आज पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील महानगरपालिकेच्या कामांचा आढावा हॉटेल रामा येथे आयोजित बैठकीत घेतला.
देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या द्ष्टीने नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे येत्या ५ नोव्हेंबरपासून स्मार्ट बस सुरु होत असल्याने नागरिकांना वाहतुकीची स्मार्ट सुविधा मिळणार आहे.
देसाई यांनी महानगरपालिकेच्या सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. त्याचबरोबर मनपा तर्फे कोरोना काळात सुरु केलेल्या उपचार सुविधा येत्या काळात सुरु ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच मेल्ट्रॉन रुग्णालय मनपाकडेच राहील व तेथे आणखी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यासह इतर सर्व रस्ते दुरुस्ती, जालना रस्त्याला समांतर रस्ता करणे आदी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
तसेच शहरातील गुंठेवारी वसाहतीतील नागरिकांना मालकी हक्क व सिडकोच्या मालमत्ता नियमित करण्याबाबतचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्याना घरे मिळणे, नवीन पाणीपुरवठा योजना, सिध्दार्थ गार्डनमधील विकास कामे तसेच मिटमिटा परिसरात विकसित केल्या जाणाऱ्या सफारी पार्कला जागतिक पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित करण्याबाबत सूचित करुन इतर महत्वपूर्ण कामांचा आढावाही मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.