उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेवर जाणार, संजय राऊत यांची माहिती.
सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यपाल नियुक्ती सदस्य म्हणून विधानपरिषदेवर वर्णी लावण्याची चर्चा होत होती. आता मातोंडकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. आज ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उर्मिला मातोंडकर यांच्याशी बोलणं झाले आहे तसेच त्यांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्यास होकार दिला आहे, असे राऊत यांनी आज सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असे निकष असल्याने सगळ्या बाजू तपासल्या जात आहेत.
यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ जणांची वर्णी लागणार असून, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर हे नाव आता निश्चित झाले आहे. यासोबत उर्मिला यांचा शिवसेना प्रवेशही निश्चित झाला असून, त्यांना प्रवक्तांच्या पॅनेलमध्येही संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.