मुंबई लोकल वरून राजकारण करू नका, अनिल देशमुखांनी खडसावले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांपासून मुंबईची लाइफ-लाईन असलेली लोकल सेवा केव्हा सुरु होणार, असा प्रश्न आज सर्वच मुंबईकरांना पडलेला आहे. त्यात आता अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी, महिला आणि सुरक्षा रक्षकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लोकल सुरु करण्याच्या मुद्यावरून आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यात एकमत नसल्याच अनेकवेळा दिसून आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये कोणतेही राजकारण आणलं जाऊ नये असेही त्यांनी खडसावले आहे. अनिल देशमुखांनी यावेळी राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेचे वेळापत्रक सुचवलं असल्याचेही सांगितले आहे. ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी दर्शवली असून, यासंबंधी विनंती करणारं पत्र रेल्वेला पाठवलं आहे. राज्य सरकारने प्रवासासाठी वेळापत्रक तयार केलं असून, तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आलं आहे. यानंतर रेल्वेकडून मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये असमर्थता दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे.