बेशिस्त दुचाकीस्वार व अनधिकृत पार्किंग विरुद्ध कडक कारवाई करा! – अरविंद सावंत
वाहतुकीची शिस्त सर्वांनी पाळणे गरजेचे असल्यामुळे बेशिस्त दुचाकीस्वार व अनधिकृत पार्किंगविरुद्ध कडक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी दिले. रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या दि. १९ डिसेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार दुसरी बैठक खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडली. यामध्ये पुढे बोलताना सावंत म्हणाले की, मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर असून, पार्किंगकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या पार्किंगबाबत सर्वांना माहिती व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.
मुंबईतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता जुनी वाहने निर्लेखित करणेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता राज्य रस्ता सुरक्षा परिषदेस कळविण्यात यावे. तसेच रस्त्याचे बांधकाम करताना अथवा रस्त्यावर एकेरी वाहतूक घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. जडवाहन वाहतूक बंदीची निश्चित वेळ पाळण्यासाठी अधिक कडक अंमलबजावणी करावी. कचरा नेणारी महापालिकेच्या वाहनांनी सकाळी ८ पुर्वी अथवा रात्री ८ नंतर कचरा उचलण्याची कामे करावी, असे निर्देश खासदार सावंत यांनी दिले.