बाळासाहेबांच्या स्मुर्ती दिनानिमित्त गर्दी करू नका, संयम पाळा! – उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला स्मृतीदिन आहे. यावेळी राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवतीर्थावर जमा होतात. मात्र, यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आपल्या भावनांना मनाच्या कप्प्यात ठेवून संयम पाळावा लागणार आहे.
‘बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणदिनी येत्या १७ नोव्हेंबरला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी करू नये, संयम पाळावा’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले आहे. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर १७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर उसळतो.
मात्र सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. तुमच्या भावना आणि तुमची श्रद्धा मी समजू शकतो. पण या वेळेस संयम पाळावा लागेल. कुणीही गर्दी करू नये. शिवसेनाप्रमुखांचे तुम्हा सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे, असे त्यांनी बोलून संयम राखण्याचे आवाहन केले आहे.