Skip to content Skip to footer

मोदींचा करिष्मा संपलाय हे बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे! – छगन भुजबळ

मोदींचा करिष्मा संपलाय हे बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे! – छगन भुजबळ

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करेल, असे चित्र जरी दिसत असले तरी नवख्या असलेल्या तेजस्वी यादव यांनी बलाढ्य अशा भारतीय जनता पक्षाला आणि जनता दलाला दिलेल्या लढतीमुळे तेजस्वी यादव यांचे सर्व देशभरातून कौतुक होताना दिसत आहे. त्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक करत ‘मोदींचा करिष्मा आता राहिलेला नाही’, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

मंत्री छगन भुजबळ नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ‘ज्या पक्षाचा आधार घ्यायचा, त्यांनाच कालांतराने संपवायचे ही भाजपची नेहमीची रणनीती आहे. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला सोबत घेतले. अवघ्या एक ते दोन जागा मिळणाऱ्या भाजपने शिवसेनेच्या आधाराने पक्ष वाढवला. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचा फटका नितीश कुमार यांना आज बसला आहे, असे भुजबळ यांनी बोलून दाखविले होते.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, बिहारची निवडणूक अटीतटीची झाली. भाजपची पहिल्यासारखी लाट राहिली नाही हेच यातून दिसले आहे. मोदींचा करिष्माही राहिला नाही, असेही भुजबळ म्हणाले. तेजस्वी यादव यांनी केलेल्या संघर्षाचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. वडील तुरुंगात असताना तेजस्वी यांनी अत्यंत कुशलपणे पक्षाचं नेतृत्व केलं. त्यांचं सरकार येवो किंवा न येवो, पण त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे देखील भुजबळ यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5