दुसरी लाट थोपवण्यासाठी बृहमुंबई महानगर पालिका सज्ज! – आयुक्त
काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्यामुळे मुंबईच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे. या वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई मनपाने आपली कंबर कसली आहे. मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतीषबाजी करण्यास बंदी घातली आहे. शिवाय फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई महानगर पालिका पूर्णपणे सज्ज आहे, अशी महिती आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे. चहल म्हणाले की, “प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीचं पालन झाले नाही तर कोरोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करायला हवे. तसेच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. महापालिकेकडे सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत”, असे चहल यांनी सांगितले.
आणखी बोलताना आयुक्त म्हणाले की, “कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता कुठे कमी होऊ लागली आहे. परंतु ती पुन्हा वाढू नये यासाठी नियमावलीची दिवाळीत कडक अंमलबजावणी करणार आहोत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दररोज २५ हजार लोकांवर कारवाई केली जाणार आहे. आधी दररोज ९ ने १० हजार लोकांवर कारवाई केली जात होती. परंतु कारवाईची तीव्रता आता वाढणार आहे”, असे आयुक्त चहल यांनी बोलून दाखविले.