साधारण दीड महिन्यांपूर्वी शिवसेनेचे खेड आळंदी विधानसभेचे प्रथम आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे निधन झाले होते. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेवर आणि गोरे कुटुंबावर हा मोठा आघात होता. त्यातून सर्व शिवसैनिक सावरत असतानाच तालुक्यातील शिवसैनिकांनी व गोरे कुटुंबांनी सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा उपक्रम राबवत खऱ्या अर्थाने स्व. गोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2014 साली खेड तालुक्यात परिवर्तन घडवून आल्यानंतर सुरेश गोरे यांनी दिपावली पाडव्यानिमित्त शिवसैनिक व मित्र परिवाराचा स्नेह मेळावा घेण्याचा पायंडा पाडला होता. त्याचे पडसाद देखील तालुक्यातील सेनेत दिसू लागले होते. नियमित कालावधी नंतर सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक एकत्र आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेनेला गोरेंच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळाले होते.
2019 साली दुर्दैवाने गोरे पराभूत झाले. तरीही गोरेंनी पाडव्यानिमित्त आयोजित केला जाणारा स्नेहमेळावा सुरू ठेवत शिवसैनिकांना एकत्र आणणे सुरू ठेवले होते. त्यांच्या अकाली जाण्यानंतर पाडव्यानिमित्त होणारा स्नेहमेळावा थांबणार की काय असे वाटत असताना शिवसैनिकांनी याच दिवशी आदरांजली सभेचे आयोजन करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील केले.
याप्रसंगी गोरेंना आदरांजली वाहताना त्यांच्या कार्याचा वसा शिवसैनिक व गोरे कुटुंबीय पुढे चालवतील आणि हीच भाऊंना श्रद्धांजली असेल असे विचार आढळराव यांनी व्यक्त केले