एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले – सामना

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले – सामना

भाजपा नेते सतत ठाकरे सरकार विरोधात “लव जिहाद’ विरोधात कायदा करण्याची मागणी करत आहे. तसेच लव जिहाद विरोधात आघाडी सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपा शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी टीका करत आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

शिवसेनेने भाजपाला लव जिहादबाबत बिहारमध्ये कायदा करण्याचा सल्ला दिला आहे. त्या कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. त्यानंतर आम्ही पाहू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

काय म्हंटले आहे सामना’च्या अग्रलेखात :

आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!

लव्ह जिहादवरून सध्या भाजपने आदळआपट सुरू केली आहे. हिंदू मुलींना मुसलमान तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्यास ‘लव्ह जिहाद’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, रोज होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे उसळलेले संकट, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट हे प्रश्न तसे गंभीर नसून ‘लव्ह जिहाद’ हेच देशासमोरचे सगळ्यात भयंकर संकट आहे व महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप पुढाऱ्यांनी केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा शर्मा यांनी मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. त्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी चिंता व्यक्त करावी हे अनाकलनीय आहे. भाजपने ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल.
लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचेही जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह लावले जातात. विरोध करणाऱ्या मुलींना ठार केले जाते. त्याच दहशतीखाली अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून हिंदुस्थानात आश्रयास आली आहेत. बांगलादेशातही वेगळे काही सुरू नाही. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजप किंवा संघ परिवारास आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पाकिस्तान, बांगलादेश सरकारला दम नक्कीच भरता येईल. एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here