Skip to content Skip to footer

मुंबईतील हादरवणारी घटना: वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या बापाने पोटच्या मुलीलाच बनवले वासनेचा बळी

नराधम १२ जूनपासून करत होता बलात्कार; पीडिता आजोळी गेल्यानंतर समोर आली घटना

मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या बापाने १४ वर्षाच्या पोटच्या मुलीलाच वासनेचा बळी बनवलं. मुलगी आजोळी गेल्यानंतर ही बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. मुलीने आपल्या आईला झालेला प्रकार सांगितल्यानंतर आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर उज्जैन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बापाकडून १२ जूनपासून सातत्यानं बलात्कार करण्यात आल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या पदावर कामाला असून, १२ जून रोजी आरोपीनं मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीचं सातत्यानं लैंगिक शोषण केलं. बापाकडून वारंवार लैंगिक शोषण होत असतानाच पीडिता काही दिवसांसाठी आपल्या आजोळी उज्जैनला गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तिने पुन्हा मुंबईत येण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने विचारणा केली. त्यानंतर पीडितेनं बापाकडूनच होत असलेल्या अत्याचाराची भयंकर गोष्ट आईला सांगितली. महिलेनं मुलीसह महिला पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

अल्पवयीन पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी जेव्हा तिची आई आजारी होती, तेव्हा वडील तिच्या बेडरुममध्ये आले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा मुलीवर अत्याचार केले. जेव्हा मुलीने अत्याचाराला विरोध केला. तेव्हा आरोपीनं तिला बहुमजली इमारतीत उंचावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली फेकण्याची धमकी दिली होती, असं पीडितेनं म्हटलं आहे.

पीडितेच्या आईनेही आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीनं घरात सीसीटीव्ही लावलेले असून, मुलीसोबत केलेल्या अत्याचाराच्या चित्रफितीही तयार केल्या आहेत. आरोपी दारूच्या आहारी गेलेला असून, मागील १६ वर्षांपासून नशेत येऊन सातत्यानं मारहाण करतो. महिलेनं पतीविरोधात अनेक वेळा पोलिसांमध्ये तक्रारी केल्या. मात्र, प्रत्येक वेळी आरोपी माफी मागायचा आणि घरी गेल्यानंतर पुन्हा मारहाण करायचा. त्यातून दोघांमध्ये दररोज भांडण होत होती. त्यामुळे महिला चार महिन्यांपूर्वी माहेरी उज्जैनला निघून गेली होती.

“पीडित मुलीनं सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुंबईत घडला आहे. त्यामुळे हे गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरेंदर सिंग यांनी दिली

Leave a comment

0.0/5