साताऱ्याचे भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसून ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले होते.
मात्र भेटीचा तपशील सांगण्यास शिवेंद्रसिंहराजे यांनी चक्क नकार दिला होता. असे असले तरी देखील पवार-शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीनंतर बारामतीतून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण सुरु झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार ऐकायला मिळत आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांनी रविवारी सकाळी अजित पवार यांची बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये भेट घेतली. तेथे बंद खोलीमध्ये शिवेंद्रसिहराजेंनी अजित पवार यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठून भेटीबाबत प्रश्न विचारले. मात्र आपण केवळ मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे काहीही नव्हते असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.