टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही…, शिवसेनेने लगावला सामनातून जोरदार टोला

पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. यावरुन शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यातून भाजपावर निशाणा साधला आहे.

“जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे.

हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात ते असह्य ठरतात. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. त्यास काही प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here