Skip to content Skip to footer

हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा – सिंधुताई सकपाळ

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली. यात एकूण ६ महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी सामाजिक कार्यकर्त्या आणि दीनदुबळ्यांची आई सिंधुताई सकपाळ यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या पुरस्कारावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच हा पुरस्कार मला सहकार्य करणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. यावेळी त्यांनी नागरिकांना त्यांच्या अनाथ मुलांचे गणोगत होण्याचंही आवाहन केलं आहे.

सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यावर कळस चढला असं मला वाटतं. माझ्या लेकरांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ते फार उड्या मारायला लागलेत. पण भूतकाळ विसरता येत नाही. भूतकाळाला पाठिशी बांधून वर्तमानाचा शोध घेतेय म्हणून इथपर्यंत आले. तुम्ही सर्वांना साथ दिली, मदत केली, वेळोवेळी मायेवर चार शब्द लिहिले म्हणून माई जगाला कळली.

माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देतो कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5