मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीवर मंत्री उदय सामंत यांचे सूचक विधान.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली होती यावर मुनगंटीवार यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना “शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते.” असं काल भेटीनंतर बोलून दाखविले होते.
त्यावर शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाने या आधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असे सूचक विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार काल भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण काय चर्चा झाली हे माहीत नाही. सुधीरभाऊ हे माझे विधीमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी पूर्वीच पुढाकार घेतला असता तर आज ही वेळ आली नसती” असं उदय सामंत म्हणाले.