Skip to content Skip to footer

भाजपने कितीही वल्गना केली तरी शिवसेनेचाच महापौर होणार – हेमराज शहा

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या भव्य मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल असे सांगितले.

हेमराज शाह म्हणाले कीं, ‘अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नाव देण्यात हरकत काय आहे ? महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार १९९५ साली अधिकारारुढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्यात आले. परंतु काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नांवे अंमलात येऊ शकली नाहीत.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहित असूनही निव्वळ मुख्यमंत्र्यांना आणि आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत. २०१४ पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असतांना औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नामांतर करु शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ‘अब समय आ गया है !’ असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात परंतु तो समय अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते होऊ शकलेले नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेना हा सर्व समाजाचे नेतृत्व करणारा पक्ष असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दंगलीत केवळ शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील गुजराती व्यावसायिकांचे व्यवसाय टिकले आहेत. भाजप केवळ राजकीय द्वेष्ट्यापोटी राजकारण करत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. तसेच येणाऱ्या महापालिकेत भाजपाने कितीही वल्गना केली तरी शिवसेनेचाच महापौर होणार असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5