सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे प्रमाण अधिक मोठ्या संख्येने आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात नियम अधिक कठोरपणे पाळण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य शासनाकडून देण्यात आले होते. मात्र लोकांनी निवडून दिलेले शासन प्रतिनिधीच हे नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे, असाच काहीसा प्रकार अमरावतीच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी विनामास्क दुचाकीवरून आपल्या कार्यकर्त्यांसोबत शहराचा फेरफटका मारला होता. त्यामुळे कोरोना संदर्भातील नियम न पाळल्यामुळे राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
शासनाचे कडक निर्देश असतानाही राणा दाम्पत्याने विनामास्क, विनाहेल्मेट अमरावतीमधील रस्त्यांवरून दुचाकीवरुन सफर केली होती. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात टीका होत होती.
लोकप्रतिनिधीच असे वागतील तर त्यांचे कार्यकर्ते बेछुट सुटतील असा आरोपही होत होता. आता याप्रकरणी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या सह १५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यावर राणा दाम्पत्य काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे,