महाराष्ट्र बुलेटिन : सध्या महाराष्ट्र्रात पावसाने धुमाकूळ घातला असून या अस्मानी संकटामुळे नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गाव, शहरे हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान राज्यात कोकणाला पावसाने अधिक झोडपले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला देखील पुराचा धक्का बसला असून खेड शहरालगत असलेल्या चिंचघर प्रभुवाडी येथील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सदर ठिकाणी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान पुरामुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला व या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी पूरग्रस्तांना दिले.
या पुरामुळे नागरिकांवर बिकट परिस्थिती ओढवली असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तातडीने या परिस्थितीतून सावरण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या माध्यामातून पूरग्रस्त कुटुंबांना कर्तव्यरुपी मदत म्हणून शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांच्या मदतीने किटचे वाटप करण्यात आले आहे. सदर किटमध्ये ब्लँकेट, शर्ट, ड्राय फ्रूट, मॅगी, बिस्कीट पॅकेट्स, डाळ, तांदूळ, गहू, तेल, साबण, कडधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, चटई, चादर, टॉवेल, साडी या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.