आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

महाराष्ट्र बुलेटिन : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मंगळवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ८१ वर्षीय डॉ. तांबे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. तांबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीत चिकित्सा मध्ये तज्ञ होते. ते पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील ‘आत्मसंतुलन गाव’चे संस्थापकही होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक चिकित्सा आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवर संशोधन केले होते. त्यांचे ‘आयुर्वेदिक गर्भ संस्कार’ हे पुस्तक खूप लोकप्रिय देखील झाले.

आयुर्वेदावर अनेक पुस्तके लिहिली

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात खूप काम केले आहे. त्यांच्या गर्भधारणेवरील पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्याच्या समस्यांवर त्यांनी अनेक दशके काम केले. त्यांच्या आयुर्वेद उपचारांची केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही चर्चा झाली. तांबे यांच्या मराठीत लिहिलेल्या ‘गर्भ संस्कार’ पुस्तकाच्या अनेक लाख प्रती विकल्या गेल्या. या पुस्तकाचे इंग्रजीसह सहा भाषांमध्ये भाषांतर झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुर्वेदचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, ‘डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे. आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात व नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here