Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावलं; ‘कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाही, आंदोलनं कसली करताय?’

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारतर्फे शिथिलता दिली जात आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट अद्याप राज्यावर कायम आहे. या दरम्यान कोरोना परिस्थितीसंदर्भात विरोधकांचे राज्यात आंदोलने वाढताना दिसत आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘कोरोनाचा धोका हा कायम असून हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही, त्यामुळे आंदोलने कसली करताय ?’ अशा शब्दांत खडसावले आहे.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट मीरा रोड येथे सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पार पाडून बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना धारेवर धरले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आहे याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमुक करा तमुक करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू असे इशारे देण्यात येत आहेत. अरे आंदोलन कसली करताय? कोरोना हा काय सरकारमान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत कोरोना वाटपाचा कार्यक्रम नाहीये. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं आंदोलन करा ना,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Leave a comment

0.0/5