Skip to content Skip to footer

‘गुगल’ला ईयूचा दुसरा धक्का

ब्रुसेल्स – अँड्रॉईड ऑपरेटिंग प्रणालीत असलेल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी काल युरोपियन संघाने (ईयू) ‘गुलल’ला दुसऱ्यांदा धक्का देत विक्रमी ४.३ अब्ज युरोचा दंड ठोठावला. विश्वासभंगप्रकरणी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, गुगलने आपले वर्तन सुधारले नाही, तर भविष्यात त्यांना अशा प्रकारच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही ‘ईयू’ने दिला आहे.

गुगलने आपल्या सर्च इंजिन, ब्राऊझरसारख्या सेवांचा पाया भक्कम करण्यासाठी बाजारात असलेल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याचे निष्पन्न झाले असून, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही यावर पाळत ठेवली होती. या दीर्घ तपासाअंतीच गुगलला ४.३४ अब्ज युरो (सुमारे ३४ हजार कोटी) ठोठावण्याचा निर्णय आयोगाने घेतला, अशी माहिती  ईयूच्या स्पर्धा आयोगाच्या आयुक्ता मार्गारेट वेस्टागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुगलने ईयूच्या विश्वासभंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे वेस्टागर यांनी या वेळी नमूद केले. तत्पूर्वी त्यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत चर्चाही केली. स्वतःच्या विक्रीसेवांना सर्चमध्ये झुकते माप दिल्याप्रकरणी युरोपीय संघाने गुगलला यापूर्वी २.४ अब्ज युरोचा दंड ठोठावला होता.

९० दिवसांचा अवधी
‘इंटरनेट सर्च’मधील आपले प्रस्थ टिकवून ठेवण्यासाठी गुगल बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत असून, त्यांनी पुढील ९० दिवसांत आपली व्यावसायिक पद्धत बदलावी; अन्यथा कंपनीला तिच्या दैनिक उलाढालीच्या ५ टक्के रक्कमेइतका दंड ठोठावला जाईल, असा इशाराही मार्गारेट वेस्टागर यांनी दिला.

कारवाईविरोधात दाद मागणार 
युरोपीय संघाच्या निर्णयानंतर गुगलने निवेदन जारी करत याविरोधात दाद मागितली जाईल, असे स्पष्ट केले. अँड्रॉईडने प्रत्येकासाठी विविध पर्याय उपलब्ध केले असून, त्यामुळे कमी किमतीतील नवनवीन उत्पादने बाजारात येत आहेत, असे गुगलचे प्रवक्ते अल वेर्णी यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5