Skip to content Skip to footer

’एसबीआय’ चा ठेवीदारांना सुखद धक्का

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ( ’एसबीआय’ ) ठरावीक कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना आज सुखद धक्का दिला. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे.

बॅंकेने आपल्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, एक ते दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर ६.७० टक्के तर, दोन ते तीन वर्ष मुदतीच्या ठेवींवर ६.७५ टक्के व्याज दिले जाणार आहे. या दोन्ही मुदतींसाठी सध्या ६.६५ टक्के व्याज अदा केले जात होते. एक कोटी रुपयांच्या आतील ठेवीदारांनाच याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, बॅंकेने ७ ते ४५ दिवसांच्या ठेवींवरील व्याजदरात शक्‍यतो बदल न करता ते ‘जैसे थे’ ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वी २८ मे रोजी बॅंकेने आपल्या व्याजदरात बदल केले होते.

ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा 
‘एसबीआय’ने ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देत त्यांनी ठेवलेल्या १ ते २ वर्ष मुदतीच्या ठेवींवर ७.२० टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. शिवाय २ ते ३ वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरातही ७.२५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या मुदतीतील ठेवींसाठी सध्या ७.१५ टक्के दराने व्याज दिले जात होते.

मोठ्या ठेवीदारांची निराशा
बॅंकेने १ ते १० कोटी रुपयांच्या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या ठेवीदारांची मात्र निराशा झाली. १ ते २ वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात बॅंकेने ६.७० टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील व्याजदरही बॅंकेने ७.२० टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला आहे. या मुदतीसाठी सध्या अनुक्रमे ७ आणि ७.५० टक्के व्याज दिले जात होते. बॅंकेने १० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींवरील व्याजदरातही ६.७० टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे.

Leave a comment

0.0/5