Skip to content Skip to footer

महाराष्ट्र बॅंकेचा ‘सिबिल स्कोअर’ वर आधारित व्याजदर

मुंबई: बॅंक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांच्या ‘सिबिल स्कोअर’ नुसार वाहन कर्जे व गृह कर्जे यांसाठी विशेष व्याजदर देण्याचे जाहीर केले आहे. हा उपक्रम ग्राहकांच्या शिस्तबद्ध क्रेडिट व्यवस्थापनाची व उच्च सिबिल स्कोरची दखल घेतो व चांगला व्याजदर देऊ करून त्यांचा गौरव करतो. ग्राहकाचा सिबिल स्कोअर म्हणजे क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्टचा (सीआयआर) 3 आकडी सारांश असतो-त्यामध्ये पूर्वीचे क्रेडिटविषयक वर्तन व परतफेडीची पार्श्वभूमी यांचा सारांश असतो-आणि ही आकडेवारी 300 ते 900 या दरम्यान असते. हा स्कोअर जितका अधिक असतो तितकी कर्ज मंजूर होण्याची शक्‍यता अधिक असते. बहुतेकशा बॅंका कर्ज मंजूर करण्यापूर्वी ग्राहकाचा सिबिल स्कोअर व रिपोर्ट तपासतात. त्यामुळे लोन अंडररायटिंग प्रक्रियेतील हा महत्त्वाचा घटक आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. सी.

राऊत यांनी या उपक्रमाविषयी सांगितले, कर्जाबाबत शिस्तबद्धता पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आम्ही गृह कर्ज व वाहन कर्जावरील व्याजदर ग्राहकांच्या ‘सिबिल स्कोअर’ शी जोडण्याचे ठरवले. थोडक्‍यात सांगायचे तर, ग्राहकांचा स्कोअर जितका अधिक असेल तितका चांगला व्याजदर दिला जाईल. या उपक्रमामुळे, कमी स्कोअर असलेल्यांना कर्जाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उद्याचे अधिक माहीतगार, कर्जाबाबत अधिक जागरुक ग्राहक निर्माण करण्यासाठी मदत होईल.

या उपक्रमाविषयी बोलताना, ट्रान्सयुनियन सिबिलच्या डायरेक्‍ट टू कन्झ्युमर इंटरॅक्‍टिव्हच्या प्रमुख सुजाता अहलावत यांनी सांगितले, कर्ज देणाऱ्यांना तत्पर, कर्जाविषयी शिस्तबद्ध असलेल्या ग्राहकांशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत, आणि विशेष व्याजदर दोन्हींसाठी फायदेशीर आहे. आर्थिक जबाबदारी व कर्जविषयक शिस्त रुजवण्याच्या दिशेने टाकलेले हे सकारात्मक पाऊल आहे. ग्राहकांनी त्यांचा क्रेडिट प्रोफाइल तपासून व त्यांच्या सिबिल स्कोअरची नियमित पाहणी करून, या सवलतीचा लाभ घ्यावा.

 

Leave a comment

0.0/5