नवी दिल्ली – नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली.
नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी ट्विटरवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ १३ हजार कोटी रुपयांच्या रद्द नोटा परत आलेल्या नाहीत. या नोटांसाठी देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता ‘जीडीपी’ १.५ टक्क्याने कमी झाला. यामुळे अर्थव्यवस्थेला २.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
नोटाबंदीनंतर १५.४२ लाख कोटी रुपयांपैकी केवळ १३ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडे परत आलेले नाहीत. माझा असा संशय आहे की, हे १३ हजार कोटी रुपये नेपाळ व भूतानमध्ये असावेत आणि काही गहाळ अथवा नष्ट झालेले असावेत, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.