कोलकाता – रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज युनायटेड फोरम ऑफ रिझर्व्ह बॅंक ऑफिसर्स अँड एम्प्लॉइज या संघटनेने दिली. बॅंकेच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेत २०१२ मध्ये रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ द्यावा, तसेच इतर मागण्यांसाठी संघटनेने ४ आणि ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाची हाक दिली होती. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बॅंकेच्या व्यवस्थापनाने आणखी अवधी मागितला असून, त्यानुसार हे आंदोलन आता जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले.