Skip to content Skip to footer

आणि संग्रामदुर्ग ढसा ढसा रडू लागला.

साधारण ४५/५० वर्षांपूर्वीचा काळ असेल. गावातल्या शिवजीमंदिरात चाकण मधलाच एक शांत सुस्वभावी मुलगा अभ्यासाचे पाठ गिरवत होता. तो फक्त तिथं अभ्यासच करत नव्हता तर भविष्यात रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या इतिहासाची सुरुवात करीत होता. गावातल्या अनेक गल्लीबोळात खेळता खेळता त्या धीरगंभीर सावळ्या विठ्ठलाची नजर अनेकदा मराठयांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या संग्रामदुर्ग अर्थात चाकणच्या किल्ल्यावर पडत असे. ती शांत, धीरगंभीर आणि धोरणी दृष्टी जणूकाही कशाचातरी शोध घेत किल्ल्याच्या बुलंद बुरुजांशी संवाद साधत होती. कदाचित या शाळकरी वयातच या लहानशा पण समजूतदार विठ्ठलाने या किल्ल्याला वचन दिलं होतं की एकदिवस मी तुझ्या या जखमांवर मलमपट्टी करिन.

तसं चाकण शिवकालीन इतिहासाच्याही मागील उल्लेखात दिसून येतं. संग्रामदुर्ग आणि त्याच्या या भिंतींनी अनेकांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवल होतं. आसपासची पंचक्रोशी जरी बाजारहाट, शिक्षण, व्यापार निमित्ताने इथं येऊन गेली असली तरी या लहानग्या व्यतिरिक्त इतर कुणाशिही संग्रामदुर्ग संवाद साधत नसावा. जणूकाही फिरंगोजी नरसाळा नंतर अनेक वर्षांनी उदयास आलेला याचा एकमेव पुत्र म्हणून किल्ला या लहानग्याकडे पहात होता.

दिवस वाऱ्याच्या वेगाने सरकत होते. सर्व मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, गुरुजनांत आपला मुलगा सर्वांचा लाडका होत आहे हे पाहून किल्ल्याला अतीव आनंद होत होता. आता शालेय शिक्षण संपवून शेतकरी कुटुंबातला हा तत्ववादी मुलगा पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात जाण्याची तयारी करत होता. त्याच्या या निर्णयाने क्षणभर संग्रामदुर्गदेखील ओशाळला. त्याला भावनेनं भरून आलं. आपल्या अंगाखांद्यावर खेळलेला हा साधा पोरगा पुण्यात मोठया कॉलेजात मिळून मिसळून जाईल का ? अशी शंका किल्ल्याला सतावत होती.

पुण्याला जाताना निरोप घेण्यासाठी म्हणून भाऊ किल्ल्याच्या दरवाजाजवळ उभा राहिला आणि दोघांच्याही भावनांना पारावार राहिला नाही. सगळं बालपण, शाळा, बाजार आणि उत्सव आपल्या डोळ्यासमोर घालवलेला भाऊ आता मोठ्या शहरात जाणार आणि किती दिवसांसाठी जाणार हे पण माहीत नाही म्हणून संग्रामदुर्ग भावनेनं व्याकुळ झाला. पण भाऊ दृढनिश्चयी होता. भावनांना आवर घालत त्याने आपल्या बालपणाचा साक्षीदार असलेल्या या पुराणपुरुषाला वचन दिलं की परिस्थितीत बदल घडवून आणायचा असेल तर आपल्यालाही बदलावं लागेल. येतो….. असं म्हणून भाऊ चालू लागला. त्याचा भावनांनी वाहून चाललेला बांध कसा बसा सावरत त्याने गाव मागं सोडलं. संग्रामदुर्ग हताशपणे त्याच्या त्या सावळ्या सवलीकडे बघत, वाट पाहीन म्हणत तसाच उभा राहिला…. जसा तो शतकानुशतके उभा आहे.
इकडे भाऊ मोठ्या शहरातल्या मोठ्या कॉलेजात दाखल झाला होता. त्याकाळी कुण्या गावच्या पोराने शहरात शिकायला जावं ही तशी मोठ्या कौतुकाची गोष्ट होती. पण कौतुकाचे गोडवे गात बसणे आणि ते ऐकत बसणे भाऊच्या स्वभावात नव्हते.

कॉलेजातील पहिला दिवस होता. लेक्चर हॉलमध्ये introductoin सुरू होतं. ग्रामीण भागातून आलेली मुलं काहीशी बुजतच आपली ओळख करून देत. पण आपला परिचय करून देताना अतिशय स्वाभिमानी आणि करारी आवाजात भाऊने आपलं नाव सर्वांना सांगितलं. मी गोरे सुरेश नामदेव, राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे. खरंतर ती ओळख किंवा तो परिचय कॉलेजपुरता नव्हताच मुळी. तर ती एका बदलाची नांदी होती जी वाडिया कॉलेजमध्ये सुरू झाली होती आणि पुढे जाऊन पुणे जिल्ह्याच्या जनमानसावर राज्य करणार होती.

वसतिगृह आणि कॉलेजातील मित्रपरिवारात देखील भाऊ अतिशय अदबीने वागत असल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. तिथेच असताना प्रसंगाचे बारीक निरक्षण, विषयाचा सखोल अभ्यास आणि यश मिळविण्यासाठी तत्वाशी कसलीही तडजोड न करता प्रचंड कष्ट करण्याची भाऊची वृत्ती सगळ्यांनी पहिली होती.
कॉलेजच्या याच दिवसात आयुष्यभर पुरेल एवढी विचारांची शिदोरी भाऊने साठवली होती आणि ती घेऊन आता तो चाकणच्या परतीच्या प्रवासाला निघणार होता. संग्रामदुर्गाने सोपविलेली जबाबदारी पार पाडत शनिवारवाड्याने आता भाऊला निरोप दिला होता. दूरवर वानवडीमध्ये असलेल्या शिंदे छत्री मधून हे सगळं पाहणाऱ्या महादजींनी या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत विचारांच्या या योद्ध्याला कधी नाउमेद होऊ दिले नव्हते.

ही सगळी दौलत घेऊन भाऊ पुन्हा चाकण मध्ये दाखल झाला. कोवळ्या वयात निरोप दिलेला भाऊ पुन्हा एकदा चाकणच्या किल्ल्यासमोर उभा ठाकला होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मितहास्य होते. गेली अनेक दिवस भावनाशून्य झालेला भुईकोटावरचा भगवा आता आनंदाने फडकायला लागला होता. संग्रामदुर्गाला आनंदाचे भरते आले होते. बराचवेळ एकमेकांशी मौन गप्पा झाल्यावर भाऊ रानात जायला निघाला. गेल्या अनेक दिवसांत चाकणच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरांत झालेल्या बदलाची त्याला जाणीव झाली. कुटुंबातील ज्येष्ठांचे चाकण आणि पंचक्रोशीतील शेती, सहकार व अर्थकारणात असलेले योगदान भाऊच्या लक्षात आले होते. बाजाराचे गाव असल्यामुळे आता गोरे कुटुंबाच्या घरी कष्टकऱ्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्या होत्या. एक प्रामाणिक विश्वासू आणि धोरणी कुटुंब म्हणून आपल्या कुटुंबाला उपजतच समाजाने पुढारपण दिले आहे हे भाऊने ताडले आणि हा आनंदापेक्षा जास्त जबाबदारीचा भाग असल्याचे त्याने जाणले. दिवस जात होते. कुटुंबाचा पारंपरिक असलेला शेती व्यवसायासोबतच अर्थकारणाला गती देण्यासाठी छोटे मोठे जोडधंदे सुध्दा सुरू झाले. काळाच्या ओघात गावगड्यात अनेक बदल झाले परंतु आपले वडील नामदेव सोपाना गोरे व चुलते गुलाब सोपाना गोरे यांनी आमलात आणलेला एकत्र कुटुंबाचा विचार भाऊने पुढे चालवायचे ठरवले. कुटुंबात सर्वात मोठा असल्याने साहजिकच निर्णयप्रक्रियेत निर्णायक आणि निश्चयी मत भाऊ मांडत असे. शेती आणि सहकार क्षेत्रात प्रचंड नावलौकिक मिळत असताना राजकीय उलथापालथी पासून स्वतःला दूर ठेऊ पाहणाऱ्या भाऊला अचानक ग्रामस्थांनी सोसायटीच्या निवडणुकीला उभे करण्याचे ठरविले. पहिल्याच झटक्यात निवडून येत अध्यक्ष पदावर विराजमान होत भाऊने सहकारातून समाजकारणाची वाट पकडली आणि लोकांनीही त्याला भरभरून प्रेम दिले. ही वाटचाल करत असताना तत्वाशी कधीही कसलीही ताडजोड भाऊने केली नाही. इथून पुढे खऱ्या अर्थाने भाऊचा प्रवास सुरु झाला. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाऊने उभे राहून नेतृत्व करावे अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यानी ही ती अव्हेरली नाही.

जिल्हा परिषद सदस्य आणि मग उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात घेऊन भाऊ पुन्हा एकदा संग्रामदुर्गासमोर उभा राहिला. पोराच्या अंगावरच्या गुलालकडे बघताना किल्ल्याला भरून आले. आज किल्ल्याच्या बेलाग आणि बुलंद तटबंदी मध्ये विशेष चैतन्य जाणवत होते. आपले इतक्या दिवसाचे अस्तित्व व्यर्थ नाही. आपल्या नावाची पताका सर्वदूर फडकवणारा हाच तो सुपुत्र म्हणून आज संग्रामदुर्ग विशेष आनंदात होता. भाऊने हात जोडून किल्ल्याला नमस्कार केला आणि त्या पुराणपुरुषाने देखील सहस्रावधी आशीर्वाद भाऊवर उधळले आणि सांगितलं, “भाऊ आता तू नुसता माझा लाडका मुलगा भाऊ राहिला नाहीस, तर तमाम गरीब, कष्टकरी, शेतकरी, वंचित शोषित वर्गाचा तारणहार झाला आहेस. मोठ्या पदासोबत मोठ्या जबाबदाऱ्या देखील येतात आणि त्या तू पार पाडशील याची मला खात्री आहे.”
वडीलकीचा तो सल्ला ऐकत भाऊ पुढे निघाला होता. मागून जनता गुलाल उधळत होती. पुढे जाताना भाऊनी किल्ल्याला वचन दिलं, तुझे अनंत उपकार आहेत माझ्यावर आणि अपेक्षा देखील. तुझा भाऊ त्या कधीही अपूर्ण ठेवणार नाही.

सर्वांचा लाडका भाऊ आता लोकनेता झाला होता. कामाचा प्रचंड मोठा आवाका आणि प्रचंड लोकसंग्रह. या रणधुमाळीत अंगावर गुलाल भंडारा घेताना कपड्यावर कोणताही डाग लागणार नाही याची भाऊने पुरेपूर दखल घेतली होती. लोकहिताची कामे करता करता त्या भाऊचा ते भाऊ कधी झाले हे कुणालाच समजले नाही. परंतु या पद आणि प्रतिष्ठेची कसलीही हवा भाऊंच्या डोक्यात गेली नाही. अतिशय ताकदीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद भूषवित असताना येणाऱ्या आमदारकीची निवडणूक भाऊंनी लढवावी असा लोकांकडून आग्रह सुरू झाला. भाऊंसारखा धोरणी, निश्चयी, मितभाषी, अभ्यासू, सत्यवचनी, तत्ववादी नेता तालुक्याला मिळावा म्हणून लोकांनी आग्रह धरला. 2009 च्या निवडणुकीत अर्ज भरण्यास म्ह्णून गेले असताना पक्षाने माघार घेण्यास सांगितली म्हणून भाऊ कचेरीतून माघारी आले. सर्व कार्यकर्ते निराश भावनेत असताना भाऊ मात्र अतिशय शांत होते. प्रसंग नाराजीचा जरूर होता पण भाऊ नाउमेद झाले नाहीत. सहज संवाद साधावा म्हणून ते पुन्हा गावाकडे वळले आणि किल्ल्याच्या भग्न तटबंदीकडे पाहू लागले. आज किल्ला शांत होता आणि भाऊ मनोमन बोलू लागले. किती तोफगोळे, किती सुरुंग, खणत्या आणि पहारींचे वार सोसले असशील ? परंतु आजमितीपर्यंत तसाच उभा आहेस. नक्की कशासाठी? दोघांनाही पुढे काही सुचेना. मग त्या पुरानपुरुषानेच शांतता भंग करत सांगितले, “सगळं सोसून मी आहेच ना अजून उभा ? तू पण राहशील.”
काय बोध घ्यायचा तो घेत भाऊ तडक माघारी निघाले.

संध्याकाळी घरी आल्यानंतर सर्व निराश कार्यकर्त्यांना भाऊंनी एकच आदेश दिला…

“चला कामाला लागा.”

सगळी मरगळ झटकत कार्यकर्ते पुन्हा एकदा कामाला लागले. परंतु कुणाच्याही लक्षात येत नव्हते की उमेदवारी नाकारलेला हा मनुष्य त्या दिवशीपासून चेहऱ्यावर स्मितहास्य कसकाय घेऊन फिरतोय ? पण याचं उत्तर फक्त किल्ल्याच्या बुलंद तटबंदीला आणि भाऊंनाच माहीत होते. 5 वर्षे अथक परिश्रम घेत पुन्हा एकदा भाऊ विधानसभा लढविण्यासाठी सज्ज झाले होते. यावेळी गेल्यावेळी पेक्षा प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड ऊर्जा आणि लोकसंग्रह घेऊन भाऊ परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झाले होते. नव्हे तर आता जनताच परिवर्तन करण्यास इच्छुक होती. पूर्वेला संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि पश्चिमेला जगतगुरु तुकोबाराय यांचा आशीर्वाद घेत आपल्या अमोघ वाणीने मैदान गाजविणाऱ्या बाळासाहेबांच्या सेनेची उमेदवारी स्वीकारत खेड तालुक्यातील संयमी नेतृत्व राज्याच्या संयमी नेतृत्वाच्या मार्गदर्शनात निवडणूक लढून, एक लाख मतापेक्षा जास्त मते घेत भाऊ आमदारपदी विराजमान झाले.

आज सर्वदूर आनंद होता. भीमाशंकर पासून आळंदी पर्यन्त भंडारा उधळला जात होता. सर्वदूर अत्यानंद. सर्वांचे अभिनंदन स्वीकारत अंगावर गुलाल भांडाऱ्याची उधळण झालेले आमदार सुरेशभाऊ गोरे चाकणमध्ये दाखल झाले. अभिनंदनाचा स्वीकार करणाऱ्या भाऊंनी हसत हसत किल्ल्याकडे पाहिले. आज संग्रामदुर्गाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. जणू काही किल्ला भाऊंना सांगत होता. आयुष्यात कुणीही कितीही तोफा डागल्या तरी आपण आणि आपला निश्चय ढासळता कामा नये. अनेक पिढ्यांच्या पराक्रमाचा, त्यागाचा, संघर्षाचा साक्षीदार आज आनंदात होता. पुराणपुरुषाचा पुत्र आज आमदार झाला होता. विधिमंडळात शपथ घेतानाचे “मी सुरेश नामदेव गोरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” हे शब्द ऐकताना साऱ्या कार्यकर्ता, शेतकरी, श्रमजीवी वर्गाची छाती आनंदाने फुलली होती.
लोकांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत भाऊंनी दिवसरात्र मेहनत घेतली. अगदी स्वातंत्र्य प्राप्तीपासून ज्यागावात पायाभूत सुविधा नव्हत्या त्यादेखील भाऊंच्या रूपानेच वाड्या वस्तीवर पोहचल्या.
सगळी कामे करत असताना भाऊ एक गोष्ट विसरले नाहीत ती म्हणजे त्यांच्यामार्फत राबविला जाणारा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम. तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील श्रमिक वर्गाला त्यांच्या हक्काचे, आनंदाचे, सन्मानाचे क्षण भाऊंनी या सोहळ्यातून मिळवून दिले होते. ग्रामीण भागातील शेकडो लेकींचे कन्यादान करण्याचे पुण्य भाऊंना लाभले होते.

भाऊंच्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वानेदेखील शेतकरी मेळावे, जन आशीर्वाद यात्रा यासारख्या उपक्रमांचे नियोजन करण्याची जबाबदारी भाऊंवर टाकली. या सर्व गोष्टींमध्ये आपले नाणे खणखणीत राहील याची काळजी भाऊंनी घेतली. दरम्यानच्या काळात भाऊंच्या नेतृत्वात प्रथमच पंचायत समितीवर भगवा फडकला. चाकण व खेड नगरपरिषद यावर सत्ता, जिल्हापरिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश यामुळे भाऊंचे नाव सर्वदूर आदराने घेतले जाऊ लागले. यासगळ्या गोष्टींचा विचार करत पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारीची माळ भाऊंच्या गळ्यात घालत 2019 ची विधानसभा लढण्याची संधी दिली.
2014 ते 2019 कामांचा सपाटा लावणारे भाऊ निवडणुकीला सामोरे गेले. परंतु यावेळी नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विधायक कामांचा सर्वात यशस्वी पाठपुरावा करणारे भाऊ बंडखोरीच्या राजकारणामुळे पराभूत झाले. कोण चुकलं? कुठे चुकलं ? काय चुकलं ? कुणालाही समजेना. परंतु अनिश्चिततेचा खेळ असलेल्या राजकारणात काहीही होऊ शकते हे जाणून असलेला हा लोकनेता मात्र अजूनही तितकाच धीरगंभीर होता.
सर्व कार्यकर्त्यांना धीर देत, त्यांची समजूत काढून झाल्यावर, रात्री उशिरा भाऊ एकटेच संग्रामदुर्गाची भेट घेण्यासाठी आले.

आज तटबंदीवरच्या भगव्याने मान टाकली होती. तो नेहमीप्रमाणे फडकत नव्हता. भाऊंच्या वाटचालीचा साक्षीदार आज काहीच बोलत नव्हता. अनेक युद्ध, जय-पराजय पचवलेला तो पुराणपुरुष आज काहीच बोलत नव्हता. नेहमी पाठराखण करणारा आणि मनोबल वाढवणारा पालक आज बोलायला तयार नव्हता. थोडावेळ स्मशान शांतता पसरली. दोघेही एकमेकांकडे पहात स्तब्ध उभे होते. किल्ला आज बोलायला तयार नव्हता. भाऊ मात्र धीरगंभीर आणि शांत.
थोडा वेळ शांत राहून भाऊंनी शांतता भंग करत किल्ल्याच्या त्या बुलंद बुरुजाला प्रश्न केला. आज तू असा दुःखी का वाटत आहेस ? माझंच काय? कित्येक राजवटी, राजे, रजवाडे, यांची कारकीर्द पाहणारा, अनेक आक्रमणे परतवून लावणारा, पराक्रमी योद्ध्यांना अंगाखांद्यावर खेळवणारा आमचा संरक्षक आज शांत का ?

भाऊंना काहीच उत्तर मिळाले नाही. वातावरणात एक दुःखद शांतता पसरली होती. काहीच उत्तर मिळत नाही म्हणून भाऊ पाठ फिरवता फिरवता त्या वृद्धास म्हणाले, “तुला जर बोलायचंच नसेल तर जातो मी आणि पुन्हा कधीच येत नाही.” असं बोलताच तो वृद्ध कमालीचा कष्टी झाला आणि म्हणाला, “भाऊ काय बोलू तुला ? काळाने आमच्यावर काही बंधने घातली आहेत ती पाळावीच लागतात रे. तू म्हणतोयस ते खरं आहे. अनेक राजवटींच्या उदय अस्ताचा मी साक्षीदार आहे. पण आम्हाला भविष्य सांगण्याचे स्वतंत्र नक्कीच नाहीरे लेकरा.” भाऊंना काही कळेनासे झाले. त्यांची धीरगंभीर नजर बुरुजाकडे रोखलेली होती. पुन्हा एकदा शांतता. किल्ला काहीच बोलत नाही हे पाहून भाऊ हात पाठीमागे बांधून चालू लागले. थोडे पुढे गेल्यावर पश्चिमेच्या बाजूच्या भिंतीचा एक कोपरा ढासळ्याचा आवाज आला. भाऊंनी चिंतेने मागे वळून पाहिले तर भिंतीमधून आवाज आला. “जपून रहा भाऊ.”
तेवढं ऐकून भाऊ निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या अंधुक होत जाणाऱ्या सवलीकडे पहात संग्रामदुर्ग डोळ्यात पाणी घेऊन उभा होता.
पराभव मागे सारून भाऊ पुन्हा कामाला लागले. मंत्रालय व विधिमंडळ परिसरात भाऊ श्रमजीवी वर्गाच्या समस्या घेऊन फेऱ्या मारू लागले. ना कसली उसंत ना कसली विश्रांती.

दिवस जागतिक संकटाचे होते. कोरोना सारखी वैश्विक महामारी सर्वांना विळख्यात घेऊ पहात होती. भाऊ मात्र कामात व्यस्त होते. कष्टकरी वर्गापर्यंत अन्न धान्य, औषधोपचार कसा पोहचेल याची भाऊ व्यवस्था पहात होते. सर्वांसाठी करता करता भाऊंचे स्वतःच्या प्रकृतीकडे कधी दुर्लक्ष झाले हे त्यांनाच समजले नाही आणि अखेर त्यांना कोरोनाने गाठले.
प्रसंग बाका होता. हळू हळू भाऊंची प्रकृती ढासळत होती. जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर तालुकवासीयांची चिंता वाढत होती. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. आप्त स्वकीय, नातेवाईक मित्र परिवार यांनी देवाचा धावा सुरू केला.
आणि तो काळा दिवस उजाडला. सर्वांच्या काळजाचा वेध घेणारी भाऊंच्या निधनाची बातमी आली आणि तालुक्यावर सर्वदूर शोककळा पसरली. अनपेक्षित आणि अघटित घडले होते. कुणालाही वाटलं नव्हतं भाऊ एवढ्या लवकर सर्वांना पोरकं करतील. पोरकं नाहीतर काय ? शेकडो मुलींची कन्यादान करणारा पुण्यवान बाप आज त्यांना सोडून गेला. श्रमजीवी, कष्टकरी वर्गाचा कैवारी आता त्यांना दिसणार नव्हता. प्रत्येक कामाचे नियोजन करताना कार्यकर्त्यांना हाक मारून विचारपूस करणारा नेता आज त्यांना सोडून गेलाय यावर विश्वास ठेवायला मन तयार होईना. भाऊ ही लढाई नक्की जिंकणार असं छातीठोक पणे सांगणारा प्रत्येक कार्यकर्ता आज दुःखाच्या असह्य धक्क्यात होता. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला आज आपला सेनापती पडला आहे असं वाटू लागलं. गोरे कुटुंबावरच नव्हे तर खेड तालुक्यावर काळाने घाला घातला. भाऊ सर्वांना सोडून गेले. संपूर्ण चाकण शहर शोकसागरात बुडाले. ज्या रस्त्यांनी, ज्या भींतींनी भाऊंचे सोसायटी पासून आमदारकीच्या प्रत्येक निवडणूक निकालात स्वागत केले ते सर्व आज दुःखात निपचित पडले होते. भाऊंचं पार्थिव चाकण शहरातून चक्रेश्वर मंदिराकडे जात असताना, कधीकाळी वैभवशाली भासणारा संग्रामदुर्ग आज बकाल आणि भेसूर भासत होता. कित्येक वैभवशाली साम्राज्याचा उदयास्त पाहणारा पुराणपुरुष आज स्वतःच्या लेकराला जाताना पाहून ढसा ढसा रडू लागला.

भाऊ तुम्ही गेलात यावर आज देखील विश्वास बसत नाही. कसा बसेल ? ऊन वाऱ्यापासून संरक्षण करणारा आमचा आधारवड एवढया लवकर आम्हाला उघड्यावर टाकून जाईल असं वाटलं नव्हतं. तुमची शांत, संयमी चर्या अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. अचानक टीव्हीवर बातम्या बघताना वाटतं की आता भाऊंचा फोन येईल. तुम्ही आधार दिलेला प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्ती आज मानस्थितीने पुर्णपणे ढासळला आहे. सांगाना भाऊ… का असं केलंत? असं का वागलात ?
भाऊंशी बोलण्याची एकही संधी दिली नाहीस. परमेश्वरा तू तरी इतका निष्ठुर कसा झालास.

भाऊ खरंच ही वेळ नव्हती.
पोरकं केलंत आम्हाला.

Leave a comment

0.0/5