दक्षिण भारतातील विल्लुपुरममधल्या किल्पाक मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल एका अनोख्या गोष्टीमुळे त्या दिवशी चर्चेत आले.. सकाळी सकाळीच चार महिन्याच्या चिमुरड्या राहुलला त्याची आई राजेश्वरी एकदम क्रिटीकल कंडीशनमध्ये दवाखान्यात घेवून आली. बाळाच्या अंगावर भाजल्याच्या खुणा होत्या. पोलिसांना राहुलच्या आई वडिलांवर संशय होता. पण राजेश्वरीने जे कारण सांगितले ते डोके चक्रावणारे होते. तिच्या मते राहुलला अपोआप आग लागली होती. शांत राहुलचे अंग अचानक तापू लागले अन त्याच्या शरीरातून धूर येवू लागला. जणू शरीराच्या आत आग लावली असेल. मेडिकल चेकअप नंतरसुद्धा राहुलच्या अंगावर जळालेल्या खुणा का होत्या ते डॉक्टर नीटसे सांगू शकले नाहीत. पण एका डॉक्टरच्या मते ही एक “Spontaneous human combustion” ची केस होती ज्यात अचानक काही कारण नसताना माणूस जळायला सुरुवात होती. एखाद्या कापरासारखा. या लेखात अशाच 5 सत्य नोंदी बघायच्या आहेत.
1. पहिला जळालेला पोलोनस :
जगात आपोआप आग लागणाऱ्या माणसाची पहिली नोंद इटलीमध्ये चौदाव्या शतकात झाली. पोलोनस नावाच्या सरदाराने एकेदिवशी दारू पिताना कहरच केला. बोलता बोलता कोणाबरोबरतरी पैज लावली. ती पण कशाची तर दारू जास्त प्यायची. या पठ्यांने एक नव्हे तर दोन बादल्या स्ट्रॉन्ग वाईन ढोसली. त्याच्या बरोबरच्या पेदाडांना हे अचाट काम काही पेलवले नाही. पैज संपली पण त्यानंतर जे घडले ते भयंकरच होते. वाईन ढोसलेला पोलोनस काही वेळानंतर नाका तोंडातून धूर काढू लागला. अन बघता बघता जळू लागला. अन कोणी मदत करायच्या आधी राख झाला. विशेष म्हणजे इतर पेदाडांना काहीच झाले नाही. म्हणजे वाईन मध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता.
2. पोटातून आग ओकणारा रॉबर्ट :
सन 1967. इंग्लंड मधील ही नोंद. बसमधून प्रवास करता असताना रीटाला एक अपार्टमेंट मधील खिडकीतून निळसर ज्वाळा येताना दिसल्या. कदाचित आग लागली असेल या विचाराने तिने लगेचच अग्निशमन विभागाला फोन केला. जेव्हा कर्मचारी त्या घरी पोहचले तेव्हा त्याना जे दिसले ते विचित्रच होते. एक अभागी मनुष्याचे अर्धवट जळालेले शरीर जमिनीवर पडले होते. रॉबर्ट नावाच्या या मृत व्यक्तीच्या पोटातून निळसर ज्वाळा बाहेर पडत होत्या. अश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या कोणत्याही वस्तू अजिबात जळाल्या नव्हत्या. जळणारी गोष्ट म्हणजे फक्त पोटातून आग ओकणारा रॉबर्ट. आग कशी लागली अन पोटातून ज्वाळा का येत होत्या ते अजूनही कळाले नाही.
3. जळणाऱ्या शरीरामुळे जिंकली कोर्ट केस :
निकोल मिलेटची ही कहाणी. पर्शियातील निकोल तिच्या नवऱ्या बरोबर एक खानावळ चालवत होती. एकदिवशी तिच्या नवऱ्याला स्वयंपाकघरातून धूर येताना दिसला. त्याने लगेचच आजूबाजूच्या लोकांना जागे केले अन तडक स्वयंपाकघरात धूम ठोकली. पाहतो तर काय? निकोल संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत पडली होती. तिची अक्षरशः राख झाली होती अन त्याचा दुर्गंधीयुक्त धूर आजूबाजूला पसरत होता. पण येथेसुद्धा आजूबाजूच्या लाकडी पळ्या व भांडी जशीच्या तशी होती. निकोलच्या नवऱ्याविरुध्द कोर्टात केस केली गेली कारण त्यावेळी तोच खानावळीत होता. पण आपोआप जळणाऱ्या माणसांच्या नोंदी वकिलांनी कोर्टात सादर केल्या अन नवऱ्याची निर्दोष सुटका केली गेली. अशा प्रकारे जळणाऱ्या शरीरांना कोर्टाने तेव्हा तेथे मान्यता दिली असेच दिसते.
4. अमेरिकेतील जळणारी कवटी :
सेंट पिटसबर्ग, फ्लोरिडा, अमरिका. मेरी रिसरची घरमालकीण नेहमीप्रमाणे अपार्टमेंटमधून फेरी मारत होती. मेरीच्या खोलीच्या दरवाज्याला हात लावला असता कडी गरम लागल्यामुळे तिने मेरीला हाक मारली परंतु आतून काहीच आवाज आला नाही म्हणून लोकांनी दरवाजा फोडला. आत फक्त मेरीच्या शरीराचे जळालेले काही अवशेष चटईवर मिळाले. काही म्हणजे जळणारी कवटी अन बाकी राख. चटईला जळाल्यामुळे मध्यभागी सहा फुट भोक पडले होते. बाकी वस्तू नेहमीप्रमाणे विदाउट आग. या जळणाऱ्या कवटीने “अपोआप आग लागणाऱ्या शरीरा” बद्दल अमेरिकेला जागे केले.
5. अन आता हरलेली कोर्ट केस :
जळणाऱ्या शरीराची कहाणी सांगून कोर्टात केस जिंकल्याचे पाहिले. आता उलटी कहाणी. जॅक एन्जेल नावाच्या माणसाने पाणी गरम करणारे मशीन्स तयार करणाऱ्या कंपनी विरुध्द कोर्टात केस दाखल केली. त्याच्या मते त्याने जो “वॉटर हिटर” विकत आणला होता तो निकृष दर्जाचा होता अन त्यामुळे तो हिटर अचानक फुटला व त्याला जबरदस्त भाजले. म्हणून त्याला कंपनीने तीस लाख डॉलर्स द्यावेत हे त्याचे म्हणणे होते. परंतु जेव्हा त्याची तपासणी केली गेली तेव्हा असे लक्षात आले की जॅकचे शरीर बाहेरूनच नव्हे तर आतूनही जळाले होते. जे हिटरमुळे शक्य नाही. म्हणजे ही अपोआप जळणाऱ्या शरीराची केस होती तर. जॅक कोर्टात केस हरला हे सांगायला नकोच. गंमत म्हणजे जॅकने नंतर आपल्या ह्या अपोआप जळणाऱ्या शरीराची कहाणी सांगून व पहाणी करायला देवून अमाप पैसा मिळवला.