मुंबई :बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा भारतापेक्षा परदेशातच जास्त रमताना दिसत आहे. आता प्रियंकाचा जीवही परदेशी पोरात रंगला आहे. लग्नाच्या तयारीसाठी प्रियंकाने सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला रामराम ठोकल्याची माहिती आहे.
‘भारत’ चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने ट्विटरवरुन त्याविषयीचे संकेत दिले आहेत. ‘प्रियंका भारत चित्रपटाचा भाग नसेल. त्याचं कारण खूप खास आहे. तिने शेवटच्या क्षणी आपला निर्णय कळवला. आम्ही तिच्यासाठी खूप आनंदी आहोत. भारत चित्रपटाच्या टीमकडून प्रियंकाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा’ असं अलीने लिहिलं आहे.
प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनस यांच्यातील प्रेमसंबंधांच्या चर्चा जगभरात सुरु आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये अलीने ‘ऐनवेळी’ हा शब्द सुचवण्यासाठी ‘निक ऑफ टाईम’ हा शब्दप्रयोग वापरला. त्यामुळे प्रियंका निकसोबत नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Yes Priyanka Chopra is no more part of @Bharat_TheFilm & and the reason is very very special , she told us in the Nick of time about her decision and we are very happy for her … Team Bharat wishes @priyankachopra loads of love & happiness for life 😊😉😍
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 27, 2018
25 वर्षांचा निक जोनस अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली. प्रियंका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे.
आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठीच प्रियंका निकला सोबत घेऊन जून महिन्यात भारतात आली होती. त्यानंतर हातात हात घालून दोघं लंडनला रवाना झाले. जून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली.
प्रियंकाने भूमिका केलेल्या ‘काँटिको’ मालिकेतील तिचा सहकलाकार ग्रॅहम रॉजर्सने दोघांची ओळख करुन दिली होती. खुद्द निकनेच ही माहिती एका मुलाखतीत दिली होती. ‘न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. ‘मेट गाला विथ राल्फ लॉरेन’ कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे. भारतात जाण्यासाठी मला धीर धरवत नाही’ असं निक न्यूयॉर्कमध्ये म्हणाला होता.
via अधिक माहितीसाठी