लंडन : मानवी शरीरात मलेरिया ला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. “ऍस्टिन प्रोटिन’ हा मुख्य घटक असल्याचा निष्कर्ष संशोधनातून काढला आहे
डॉ. रॉस डग्लस व अन्य सदस्यांबरोबर यांच्याबरोबर डॉ. नांदेकर हे या संशोधनात सहभागी झाले होते. सेंटर फॉर मॉलेक्युलर बायोलॉजी (झेडएमबीएच), हिडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थिऑलॉजिकल स्टडीज (एचआयटीएस) आणि जर्मनीतील हिडलबर्ग युनिव्हर्सिटी क्लिनिक यांनी एकत्रितपणे यावर संशोधन केले आहे. मलेरियासारख्या गंभीर आजारामुळे भारतासह जगभरात आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 13 लाख लोकांना याचा संसर्ग झालेला आहे.
मलेरियासंदर्भातील शोधनिबंध “पीएलओएस बायोलॉजी’ या नियतकालिकात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे. मानवी शरीरात मलेरियाच्या परजीवींच्या हालचालींचा वेग रोगप्रतिकारक पेशींपेक्षा दहा पटीने अधिक असतो. त्यामुळे हे परजीवी पकडून नष्ट करणे पेशींना शक्य होत नाही, असे या शोधनिबंधात म्हटले आहे.
“मलेरियावर औषधे निर्मिती शक्य’
डॉ. प्रज्वल नांदेकर हे संगणकाच्या साह्याने औषधोपचार तंत्र शोधण्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते सध्या जर्मनीतील हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधक आहेत. ते म्हणाले की, अनेक ऍक्टिन प्रोटिन विशिष्ट पद्धतीने एकत्र येतात लांब दोरासारखी आकृती तयार होते. ही विशिष्ट प्रकारची मांडणीमुळेच मलेरियाचे परजीवींची हालचाल वेगाने होते. या नवीन शोधामुळेच मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषध निर्मितीसाठी नवा दृष्टिकोन मिळाला असून, लवकरच असे औषध तयार करण्यात यश येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.