नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला यापुढे प्रत्येकवेळी परदेशात जाण्याआधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खान ला परदेशात जाण्याआधी न्यायालयाची परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचा परिणाम सलमानच्या चित्रपटांच्या शूटींगवरही होणार आहे.
सलमान लवकरच अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. तसेच दबंग-३, किक-२ या चित्रपटांवरही सध्या काम सुरू आहे. पण यापुढे परदेशात जाण्याआधी त्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे निर्मात्यांची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे.
काळवीट शिकारप्रकरणी सलमानला दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण दोन दिवसाच्या आत त्याला जामिन मिळाला. काळवीट शिकार प्रकरणी सलमान व्यतिरिक्त सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. पण न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.