आपल्या वाढदिवशी आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा करणार असल्याची माहिती निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने दिली होती. करण ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार असून प्रेक्षकांच्या भेटीला बड्या स्टारकास्टसह त्याचा आगामी ‘तख्त’ हा चित्रपट येणार आहे. करिना कपूर खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर यांच्या यामध्ये भूमिका आहेत.
याबाबत ‘पिंकविला’ या मनोरंजन विषयक वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘तख्त’ हा चित्रपट असून मुघलांची कथा यामध्ये दाखवण्यात येणार असून या चित्रपटात रणवीर सिंग आणि विकी कौशल भावंडांची भूमिका साकारणार आहेत. करिना रणवीरच्या बहिणीच्या भूमिकेत, तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आलिया आहे. विकी कौशल यामध्ये औरंगजेबच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.
https://twitter.com/karanjohar/status/1027372913983275008
सिंहासनासाठी दोन भावंडांमधील वादाची ही कथा यात दाखवली जाणार आहे. ही कथा शाहजहान आणि मुमताज यांच्या मुलांच्या जीवनाभोवती फिरणारी असून रणवीर, करिना आणि विकी कौशल त्यांच्या मुलांच्या भूमिकेत आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित बिग बजेट चित्रपट आणि त्यासोबतच मोठी स्टारकास्ट यांमुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.