मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सईने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली असून तिने तब्बल दहा किनो वजन वाढवलं आहे.
दिग्दर्शक तबरेज नूरानीच्या आगामी ‘लव्ह सोनिया’ मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. मुलांची तस्करी या विषयावर हा चित्रपट बेतला आहे. या सिनेमात ती वेश्या व्यवसायात दलाली करणाऱ्या अंजलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. “ही व्यक्तिरेखा टिपिकल हिरोईनच्या साच्यात बसत नसल्याने ती खरी वाटावी, यासाठी मी दहा किलो वजन वाढवलं आहे,” असं सईने सांगितलं.
या भूमिकेसाठी या स्त्रियांची देहबोली, त्यांच्या वागण्या-बोलण्याची पद्धत हे मला शिकता आलं. आयुष्य जगताना शरीराची होणारी हेळसांड आणि शरीराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे वाढलेलं वजन, अशा स्त्रीची व्यक्तिरेखा मला साकारायची होती. त्यासाठी वजन वाढवणं गरजेचं होतं, असं सई म्हणाली.
पाहा ट्रेलर:
‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘गजनी’ आणि ‘हंटर’ या चित्रपटात सई झळकली होती. आता ती ‘लव सोनिया’ मध्ये दिसणार आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सईने याआधी वजनदार या चित्रपटासाठी वजन वाढवलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत प्रिया बापटही होती. त्यानंतर दोघांनी वजन कमी देखील केलं होतं.