Skip to content Skip to footer

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टरची कहाणी मोठ्या पडद्यावर…

आपल्याकडे सध्या बायोपिकचं पीक आलंय. आधी बालगंधर्व, मग लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर आणि भाई व्यक्ति की वल्ली नंतर आता नवीन सिनेमा येतोय आनंदी गोपाळ!!

आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचं नाव माहीत नसेल असा मराठी माणूस नसेल. आनंदीबाई ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यामुळं त्यांचं नाव बऱ्याच सरकारी दवाखान्यांनाही दिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण या आनंदीबाई त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करण्याआधीच मरण पावल्या आणि भारताच्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमाबाई सावे यांचं नाव घेतलं जातं. अर्थात त्यामुळं आनंदीबाईंचं कर्तुत्व कमी होत नाही. त्यांच्या आयुष्यावर याआधी पुस्तकं आणि दूर्दर्शन मालिका आल्या होत्याच, आणि आता सिनेमा निघतोय ही खचितच चांगली गोष्ट आहे. पण हा सिनेमा खरोखरी त्यांचं आयुष्य नीट दाखवेल की लोकांना माहित असलेल्या त्याच त्या खोट्या कहाण्या पुन्हा रंगवून सांगेल??

https://youtu.be/Z9jzY_9dvUc

हा प्रश्न आम्हांला का पडलाय?

आनंदीबाई १८८७ मध्ये वारल्या. तेव्हा त्यानंतरच्या एकाच वर्षात त्यांच्या जीवनावर दोन चरित्रे लिहिली गेली. एक होतं काशीबाई कानिटकरांचं आणि दुसरं कॅरोलीन डॉल यांनी लिहिलेलं. काशीबाई आनंदीबाईंच्याच काळातल्या. त्या आनंदीबाईंना कधी भेटल्या नाहीत, मात्र त्यांच्या नवऱ्याला- गोपाळरावांना त्या भेटल्या. किंबहुना त्यांच्या पुस्तकातली बरीचशी काशीबाईंनी माहिती गोपाळरावांकडूनच घेतली. त्यामुळं काशीबाईंनी लिहिलेलं चरित्र गोपाळरावांच्या बाजूचं-काहीसं एकांगी- म्हणजेच त्यातले सगळे तपशील खरे आहेत असं नाही.

कॅरोलीन डॉल ही आनंदीहून बरीच मोठी होती. ती आनंदीबाईंना अमेरिकेत भेटली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चमक पाहून कॅरोलीनबाई थक्क झाली होती. आनंदी जात्याच सोशीक. आणि मुलीच्या जातीने काय काय करू नये याची शिकवण लहानपणापासून असल्याने ती नवरा हा विषय सोडून कॅरोलीनकडे पुष्कळ बोलली होती. त्यामुळे आनंदीबाईंना नक्की काय वाटतं, हे कॅरोलीनपर्यंत काही प्रमाणात पोचलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता गंमत अशी आहे की भारतातल्या लोकांनी आनंदीबाईंबद्दल लिहिताना काशीबाईंचं पुस्तक वापरल्यानंकाहीतपशील चुकीचे आहेत. त्यात सगळेजण श्री. ज. जोशींनी काशीबाईंचं पुस्तक प्रमाण मानून लिहिलेलं आनंदी-गोपाळ समोर ठेवून आनंदीबाईंच्या जीवनावर सिनेमा मालिका बनवतात, त्यामुळं तिथंही सगळा आनंदच असतो.

आता सिनेमा येईल तेव्हा आपल्याला काय दाखवलंय आणि नेमकं सत्य काय आहे हे आम्ही तुम्हांला सांगूच. पण सध्या तरी आपण नुकत्याच रिलीज झालेल्या मोशन पोस्टरबद्दल बोलूयात. या पोस्टरवर “ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही” हे वाक्य आहे. प्रत्यक्षात मात्र अमेरिकेतल्या वास्तव्यात- तिच्या मेडिकल शिक्षणाच्या थिसिसमध्ये आणि सगळीकडे आनंदीबाई आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल चकार वाकडा शब्द बोलल्या नव्हत्या. आपल्या देशाला आणि धर्माला कुणि वाईट बोलू नये म्हणून प्रसंगी बालविवाह आणि अनेक बाळंतपणासारख्या वाईट चालीरितींची त्यांनी बाजू उचलून धरली होती.

असो…झी स्टुडिओज हा सिनेमा काढत आहे म्हणजे त्यांची रिसर्च टीम उत्तम असेल अशी आपण आशा करुयात. त्यांच्या सिनेमाचा तांत्रिक आणि सांगितीक दर्जा उत्त्तम असतो, त्यामुळं हा सिनेमा २०१९ मधला एक महत्त्वाचा सिनेमा ठरेल यात काही वाद नाही.. तुम्हांला काय वाटतं?

Leave a comment

0.0/5