जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. बाळासाहेबांच्या आवाज हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवायचा.
बाळासाहेबांच्या भाषणाला लोकं दुरून दुरून येऊन गर्दी करायचे. बाळासाहेबांना ऐकणं हि अनेकांसाठी पर्वणी असायची. अक्षरशः त्यांचं भाषण ऐकताना अंगावर शहारे यायचे.
बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्यावर येत असलेल्या ठाकरे चित्रपटात देखील तीच जादू पुन्हा बघायला मिळेल अशी अनेकांची आशा होती. पण मराठीतील ठाकरे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यातील बाळासाहेबांचा आवाज कुणालाही आवडला नाही. अनेकांनी त्यावर नेटवरून टीका देखील केली.
ठाकरे ट्रेलरमधल्या इतर सर्व गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. त्यातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गेट-अपचं, त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होतंय. सगळे प्रसंग आणि डायलॉग सैनिकांच्या मनावर शहारा आणणारे आहेत. पण मराठी ट्रेलरमधील बाळासाहेबांचा आवाज हि एकच गोष्ट फारशी कुणालाच आवडलेली नाही.
बाळासाहेबांसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला होता. ट्रेलर रिलीज झाल्यापासून बाळासाहेबांना बाळासाहेबांचाच आवाज असायला हवी, अशी तीव्र इच्छा नेटकरी व्यक्त करत होते. नेटकऱ्यांची हि इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नेटकऱ्यांच्या या मागणीची दखल निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली आहे.
‘साहेबां’चा आवाज बदलण्याबाबत विचार सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. नेटिझन्सच्या इच्छेनुसार आवाजाचे जादुगार, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्याची तयारी केली जातेय.
बाळासाहेबांच्या आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या आवाजाची भूमिका खूपच मोलाची ठरली होती. त्याच्याच जोरावर बाळासाहेबांनी भल्याभल्यांना हादरवलं होतं, मराठी माणसाला – हिंदूंना साभाळलं होतं, शिवसैनिकांना बळ दिलं होतं. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या सभा आजच्या तरुणाईनं ऐकल्यात. त्यांचा आवाज महाराष्ट्रवासीयांच्या मनात आहे. म्हणूनच, ‘ठाकरे’मध्ये बाळासाहेबांसाठी वापरलेला आवाज सगळ्यांनाच खटकला आणि त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली.