समलैंगिक विवाहाबद्दल विधान करून फसला आयुष्मान खुराना, Twitter वर मागितली माफी

बॉलिवूडची हिट मशीन म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात आयुष्मान एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात आयुष्मान पहिल्यांदाच ‘गे’ तरुणाची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये समलैंगिक विवाहाबद्दल केलेल्या एका विधानामुळे आयुष्मान खुरानाला माफी मागावी लागली आहे.

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये आयुष्माननं भारतात समलैंगिक विवाह कायदेशीर आहे असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यांनं सर्वांनाच धक्का बसला होता. 2018 मध्ये भारतात समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आलं आहे. पण समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता अद्याप मिळालेली नाही. त्याच्या या वक्तव्यावरुन त्याला ट्विटरवर ट्रोल केलं जात होतं. नुकत्याच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना आयुष्मान म्हणाला, ‘मला अभिमान वाटतो की आपण एका समुदायाला पाठिंबा देत आहोत. आपला देश एवढा प्रगतीशील आहे की आपण समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे.’

सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर आयुष्मानला त्याची चूक लक्षात आली. यानंतर त्यानं आपली चूक मान्य करत ट्विटरवरुन या चुकीबद्दल माफी मागितली आहे. त्यानं ट्विटरवर लिहिलं, या ठिकाणी माझ्या बोलण्यात चूक झाली आहे. पण मी आशा करतो की लवकरच आपल्या देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल.

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात जितेंद्र सुद्धा ‘गे’ भूमिकेत आहे. याशिवाय या सिनेमात नीना गुप्ता आणि गजराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हितेश यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here