पुन्हा होणार का कविताची बिग बॉसच्या घरात एण्ट्री?
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या शोचं यंदाचं पर्व चांगलंच चर्चिलं जात आहे. या शोच्या सुरुवातीच्या पहिल्या भागापासून हा कार्यक्रम विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्यातच या घरात अभिनेत्री कविता कौशिकची एण्ट्री झाली होती. विशेष म्हणजे या घरात पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच एजाज आणि तिच्यात वादाची ठिणगी पडली. त्यामुळे कविता चांगलीच चर्चेत आली होती. परंतु, अवघ्या काही दिवसांमध्ये कविताला या घरातून बाहेर पडावं लागलं आहे.
अलिकडेच या शोमध्ये डबल एलिमिनेशनचा डाव रंगल्याचं दिसून आलं. या डावात कविता आणि निशांत यांना घर सोडावं लागलं आहे. हे दोघंही रेड झोनमध्ये होते. विशेष म्हणजे कविता याच आठवड्यात बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती.
दरम्यान, बिग बॉसमध्ये पदार्पण केल्यानंतर कविता कॅप्टनसीचा टास्कदेखील जिंकली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या टास्कमध्ये तिला रेड झोनमध्ये टाकण्यात आलं आणि आता तिला थेट बिग बॉसच्या घरातूनच काढण्यात आलं आहे. मात्र, कविता लवकरच वाईल्ड कार्ड एण्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.