नांदेडच्या एका कर्मचाऱ्यानं मागितली ‘घोड्यावरुन’ कार्यालयात येण्याची परवानगी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना साथीमुळे देशातील बरीच कार्यालये कित्येक महिन्यांपर्यंत बंद राहिली आणि आता ती हळू हळू उघडत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश कर्मचारी अजूनही घरून काम करीत आहेत आणि पुरेशा रहदारीच्या सुविधांच्या अभावामुळे बर्‍याच कर्मचार्‍यांनी प्रवासासाठी दुचाकी आणि कार वापरण्यास सुरवात केली आहे. पण राज्यात नांदेड येथे एक कर्मचारी आहे, ज्याने घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी या कर्मचार्‍याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले होते, जे आता व्हायरल झाले आहे.

या पत्राची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. हे पत्र लिहीणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश पंजाबराव देशमुख असे आहे, जे की नांदेड जिल्हा कार्यालयात रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक खाते अधिकारी म्हणून काम करतात. सतीश यांना पाठीचा त्रास आहे, त्यामुळे ते दुचाकीवरून ऑफिसला येऊ शकत नाहीत.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी सतीश यांनी घोड्यावर बसून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी त्यांनी घोडा खरेदी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सतीश यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की घोड्याने प्रवास करून ते वेळेवर ऑफिसला येऊ शकतात. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे लिहिले आहे की, जर ते घोड्याला ऑफिसमध्ये आणत असतील तर त्यांना हा घोडा कार्यालयाच्या आवारात बांधण्याची परवानगी देण्यात यावी. सध्या हे पत्र सोशल मिडीयामध्ये बरेच चर्चेत आहे आणि त्यावर लोकांच्या मजेशीर कमेंट्स देखील येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here