Skip to content Skip to footer

FAU-G ची जबरदस्त ‘क्रेझ’, दोनच दिवसात प्ले-स्टोअरवर बनला TOP Free गेम

अलिकडेच लाँच झालेला FAU-G (Fearless and United Guards) हा ‘मेड इन इंडिया गेम’ भारतीय गेमप्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय होत असल्याचं दिसतंय. प्रजासत्ताक दिनी लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी हा गेम डाउनलोड केलाय. यासोबतच हा गेम गुगल प्ले स्टोअरवरही  TOP Free गेम ठरला आहे.

FAU-G डेव्हलप करणाऱ्या nCore Games ने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली असून प्ले-स्टोअरच्या टॉप फ्री गेम्सच्या यादीत FAU-G गेम अव्वल ठरल्याचं म्हटलं आहे. सध्या FAU-G केवळ गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरील थीममध्येच उपलब्ध आहे. पण लवकरच ‘टीम डेथमॅच’, ‘फ्री फॉर ऑल’ आणि ‘बॅटल रॉयल मोड’ अशा तीन शानदार थीम गेममध्ये येणार आहेत.  प्ले-स्टोअरवर टॉप फ्री गेम ठरला असला तरी अद्याप हा गेम आयफोन युजर्ससाठी लाँच झालेला नाही, त्यामुळे आयफोन युजर्सना FAU-G खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे.

लाँचिंगआधीपासूनच FAU-G बाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्टर केलं होतं. त्यानंतर आता प्ले-स्टोअरवरील आकडेवारीवरुन अवघ्या दोन दिवसांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केल्याचं समोर आलं आहे. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. अखेर हा गेम आता उपलब्ध झाला आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे. 460 MB साइजचा हा गेम आहे.

भारतीय सैनिकांवर आधारित :-
FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

टक्कर कोणाला ?
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

Leave a comment

0.0/5