Skip to content Skip to footer

चीनमध्ये सर्च इंजिन नको ; गुगलच्या कर्मचाऱ्यांचा विरोध

सॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात निर्बंध मान्य करण्याच्या विचारात आहे. गुगल मोबाईल सर्च इंजिन चीनमध्ये सुरू करणार आहे. यातून काही संकतेस्थळे तसेच, काही संदर्भ वगळले जाणार आहेत. अमेरिकी लष्करासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन तयार करण्याच्या प्रकल्पाला गुगलने कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे यावर्षी मुदतवाढीस नकार दिलेला होता.

चीन सरकारच्या अटी मान्य करण्यावरून गुगलच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. चीनची सेंसॉरशिप मान्य करून तिला एकप्रकारे गुगल मान्यता देत आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गुगलच्या नीतीमूल्यामध्ये वाईटाला साथ देऊ नये, असे मूल्य असून, याचा भंगच कंपनीकडून होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कंपनी काम करीत असलेल्या प्रकल्पाची पारदर्शकता असायला हवी आणि त्याची प्रक्रियाही खुली असावी. कर्मचाऱ्यांना ते काय काम करणार आहेत, याची माहिती मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणावर गुगलच्या प्रवक्‍त्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5