Skip to content Skip to footer

अमेरिका-चीनमधील चर्चा निष्फळ ; व्यापार युद्धावर तोडगा नाहीच

वॉशिंग्टन : व्यापार युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका व चीनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरल्याचे आज स्पष्ट झाले. या चर्चेतून कोणताही ठोस पर्याय समोर आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उभय देशांच्या शिष्टमंडळामध्ये व्यापार संबंधात निष्पक्षता व संतुलन बनवून ठेवण्याच्या दृष्टीने विचारांची देवाण-घेवाण झाल्याचे व्हाइट हाउसच्या प्रवक्‍त्या लिंडसे वॉल्टर्स यांनी सांगितले. मात्र, या चर्चेविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने ही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे स्पष्ट करीत यापुढे दोन्ही देश आपापसात संपर्क बनवून ठेवतील, असे म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने व चीनने गुरुवारी एकमेकांकडून आयात केल्या जाणाऱ्या 16 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची घोषणा केल्यामुळे व्यापार युद्धावरून निर्माण झालेल्या तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांपर्यंत कोणत्याही वाटाघाटी करणार नसल्याचा पवित्रा चीनने घेतल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे.

नव्याने शुल्क आकारण्याची तयारी 

व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आतापर्यंत एकमेकांकडून आयात होणाऱ्या 50 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारले आहे. याबाबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने चीनच्या आणखी 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर तर चीनने अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5