Skip to content Skip to footer

गुगलकडून 5 लाख युजर्सचा डेटा सार्वजनिक, गुगलप्लस होणार बंद

गुगलने आपलं सोशल नेटवर्क गुगलप्लस बंद करायचं ठरवलं आहे, कारण त्याच्या युझर्सचा डेटा सार्वजनिक झाला होता. गुगलप्लसच्या सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या एका बगमुळे लोकांनी खाजगी म्हणून सेव्ह केलेली माहिती सार्वजनिक झाली. ती कोणत्याही तिसऱ्या माणसाच्या हाती लागू शकण्याचा धोका आहे.

जवळपास 5 लाख युझर्सला याचा फटका बसलेला असू शकतो असं गुगलचं म्हणण आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार हा डेटा खाजगी न राहाता सार्वजनिक झाला हे गुगलला मार्चमध्येच माहीत होत, पण त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली.

वॉल स्ट्रीट जर्नलनं गुगलच्या एका कार्यालयीन मेमोचा उल्लेख केलेला आहे ज्यात म्हटलं आहे की, ही (डेटा सार्वजनिक झाला) गोष्ट आता उघड केली तर ‘त्यावर लगेचच कारवाई होऊ शकते.’ लोकांना सांगण्याइतका हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता असं गुगलने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

“आमच्या प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन ऑफिसनं या गोष्टीची सखोल तपासणी केली. कोणत्या प्रकारचा डेटा सार्वजनिक झाला आहे, त्याचा गैरवापर झाल्याचे काही पुरावे आहेत का? आणि यावर डेव्हलपर किंवा युझर्स काय करू शकतात याची संपूर्ण चाचपणी आम्ही केली. या तपासणीत आम्हाला कोणतेही धोके आढळले नाहीत.”

फसलेला प्रयोग

गुगलप्लस 2011 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. फेसबुकच्या तुलनेत हा प्रयोग फसला आहे हे तेव्हाच लक्षात आलं होतं. गुगलप्लस बंद होणार असं अनेक वर्षं म्हटलं जात होतं. सरतेशेवटी आता गुगल हे सोशल नेटवर्क युझर्ससाठी बंद करत आहे. मात्र जे व्यावसायिकरित्या या नेटवर्कचा वापर करतात त्यांना आम्ही ही सुविधा पुरवत राहू असंही गुगलने पुढे म्हटलं आहे.

गुगलचे इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष बेन स्मिथ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “गुगलला मोठ्या प्रमाणात युझर्स मिळाले नाहीत. त्याचं अॅप तर फारच कमी लोक वापरतात.”

याआधी गुगलप्लसच्या युझर्सची माहिती द्यायला गुगल टाळाटाळ करायचं पण आता हा डेटा सार्वजनिक झाल्याने कंपनीने या सोशल नेटवर्कचं महत्त्व कमी केलं आहे.

“सर्वसामान्य लोकांसाठी बनवलेल्या गुगलप्लसला फारच कमी प्रतिसाद आहे. आणि त्याचा वापरही फार कमी होतो. जवळपास 90 टक्के युझर्सचे सेशन्स पाच सेकंदही टिकत नाहीच,” असंही ते पुढे म्हणाले. यानंतर गुगलची मुख्य प्रवर्तक असलेल्या अल्फाबेटचे शेअर्स 1.23 टक्क्यांनी घसरले आहेत.

Leave a comment

0.0/5