Skip to content Skip to footer

फ्रान्स : सरकार नमले; पेट्रोल डिझेलवरील कर वाढीला स्थगिती

फ्रान्सचे पंतप्रधान इदुआ फिलप यांनी इंधनावरील कर वाढीला सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. लोकांचा असंतोष ऐकला पाहिजे, असं ते म्हणाले. जे यामुळे प्रभावित होत आहेत, त्यांच्याशी योग्य चर्चा झाल्याशिवाय कर वाढ लागू केली जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात गेली 3 आठवडे फ्रान्समध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सच्या महत्त्वाच्या शहरांत हे आंदोलन पसरलं. सोमवारी आंदोलकांनी सरकारसोबतच्या चर्चतून माघार घेतली होती. त्यानंतर सरकारने कर वाढीला स्थगिती दिली.

फ्रान्समध्ये इंधनदरवाढीवरून सुरू असलेल्या आंदोलनात मार्से शहरात सोमवारी 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान या महिलेच्या अपार्टमेंट परिसरातच निदर्शनं सुरू होती. शटर बंद करत असताना तिला अश्रुधुराची नळकांडी लागली होती.

संबधित महिलेला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण ऑपरेशनदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान इतर तीन लोकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

रविवारी झालेल्या निदर्शनांमध्ये देशभरातल्या 1,36,000 लोकांनी सहभाग घेतल्याची माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.

पॅरीसच्या महापौरांच्या मते शनिवारी झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान 3 ते 4 दशलक्ष युरोंचं नुकसान झालं आहे.

येलो वेस्ट (Yellow vest) चळवळीच्या प्रवक्त्यांनी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी सोमवारी केली होती.

सोमवारीसुद्धा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. यामध्ये आणीबाणी लागू करण्याविषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.

ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग आहे त्यांची अजिबात गय केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं फ्रान्सचे न्यायमंत्री निकोल बेलुबोट यांनी सांगितलं आहे.

रविवारी घेतलेल्या बैठकीआधी मॅक्रॉन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पॅरिसमध्ये झालेल्या निदर्शनात 100 लोक जखमी झाले आहेत. त्यात सुरक्षादलातील 23 जणांचा समावेश असून आतापर्यंत 400 लोकांना अटक करण्यात आली आहे.

मॅक्रॉन यांनी त्यांच्या निवासस्थानी एक आपत्कालीन बैठक घेतली. त्यात गृहमंत्री आणि सुरक्षा दलातील उच्चाधिकाऱ्यांचा समावेश होता.

आंदोलकांच्या रोषाचं कारण काय?

फ्रान्समध्ये डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या साधारण दर 1.51 युरो प्रतिलीटर म्हणजे अंदाजे 121 भारतीय रुपये एवढा असून, हा दरातला उच्चांक यापूर्वी 2000च्या आसपास होता.

जागतिक पातळीवर इंधनाच्या किंमती वाढल्या, त्यानंतर कमीसुद्धा झाल्या. मात्र मॅक्रॉन सरकारने यावर्षी डिजेलवरील हायड्रोकार्बन टॅक्स प्रतिलिटर 7.6 सेंट्सने (100 सेंट्स = 1 युरो) वाढवला आहे. तसंच पेट्रोलवरील ही करवाढ प्रतिलीटर 3.9सेंट्सनी झाली आहे.

पण या सगळ्या प्रकरणात खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा सरकारने सध्या असलेल्या दरांवर आणखी 6.5 सेंट्स प्रतिलीटर डिजेलवर आणि 2.9 सेंट्स प्रतिलीटर पेट्रोलवर कर लादण्याची घोषणा केली.

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इंधनवाढीसाठी जागतिक पातळीवरील तेलाच्या किमतींना दोषी ठरवलं आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी निगडित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी खनिज तेलांवर जास्त कर लावावा लागेल, असं मॅक्रॉन म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5