वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका बैठकीत जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांचे नाव विसरले. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन कामगार बल सल्लागार मंडळाची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या महत्त्ववर चर्चा करण्यासाठी टिम कुक देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या नावाचा चक्क टिम अॅपल असा उल्लेख केला.
ट्रम्प म्हणाले, टिम आपण सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहात. आपण सुरुवातीपासूनच मला ज्या गोष्टी पाहिजे त्या करत आहात. आपण आमच्या देशात मोठी गुंतवणूक केली आहे आणि आम्ही त्याबद्दल टिम अॅपलचे कौतुक करतो.
सध्या ट्रम्प यांच्या त्या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून आतापर्यंत 30 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसेच लोक आपआपल्या परीने ट्रम्प यांची टेर देखील खेचत आहेत. ट्विटरवर एका युझरने टीम अॅपल-अध्यक्ष ऑरेंज असे लिहिले आहे.
ट्रम्प यांनी आधी देखील बऱ्याच लोकांचे नामकरण केले आहे. त्या यापूर्वी जानेवारीत अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना ‘जेफ बोझो’ म्हणून संबोधले. बेझोस यांच्या वॉश्गिंटन पोस्ट या वर्तमानपत्रात ट्रम्प यांनी आपल्या विरोधात छापलेल्या बातमीवर नाराजी देखील व्यक्त केली होती.
ट्रम्प यांनी मागील वर्षी लॉकहीड मार्टिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिलन ह्यूसन यांना ‘मर्लिन लॉकहीड’ असे म्हटले होते. तथापि, त्यांनी टिम कुकला पहिल्यांदाच टिम अॅपल म्हटले. 8 वर्षांपासून टिम कुक अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.