न्यूझीलंडमधल्या क्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली आहे.
“न्यूझीलंडसाठी हा एक काळा दिवस ठरला आहे. या प्रकारच्या हिंसाचाराला देशात कोणतंही स्थान नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या पाठिशी आम्ही आहोत,” असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटलं आहे.
न्यूझीलंडचे पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे की, “याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यात 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पण यामुळे धोका टळला, असं म्हणता येणार नाही.”
या गोळीबारात बांगलादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका इसमाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
परिस्थिती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
मशिदीच्या आत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर या क्षेत्रात प्रवेश न करण्याची पोलिसांनी विनंती केली आहे. यामुळे परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्षदर्शी मोहान इब्राहिम यांनी New Zealand Heraldला सांगितलं की, “सुरुवातीला हा एक इलेक्ट्रिक शॉक आहे, असं आम्हाला वाटलं. पण नंतर लोक धावायला लागले. माझे काही मित्र अजूनही आत आहेत. मी माझ्या मित्रांना आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण मला काही प्रतिसाद मिळाला नाही. मला माझ्या मित्रांची काळजी वाटतेय.”
प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी मृतदेह बघितल्याचा दावा केला आहे. पण पोलीस किंवा अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
याच भागातील दुसऱ्या मशिदीचा परिसरही रिकामा करण्यात आल्याची माहिती आहे.